बोरदैवत ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
पेसा दिन
पेसा दिवस म्हणजे पंचायत (अनुसूचित क्षेत्रांपर्यंत विस्तार) कायदा, १९९६ (PESA Act) लागू झाल्याच्या वर्धापनदिनानिमित्त २४ डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा दिवस आहे, जो आदिवासी भागातील ग्रामसभांना स्व-शासनाचे अधिकार देतो आणि लोकसंस्कृतीचा उत्सव साजरा करतो; या निमित्ताने जनजागृती आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
पेसा कायद्याबद्दल माहिती (About PESA Act):
पूर्ण नाव: पंचायत (अनुसूचित क्षेत्रांपर्यंत विस्तार) अधिनियम, १९९६ (Panchayat (Extension to Scheduled Areas) Act, 1996).
उद्देश: भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील अनुसूचित क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांसाठी ग्रामसभांद्वारे स्वशासन सुनिश्चित करणे.
लागू: हा कायदा २4 डिसेंबर १९९६ रोजी देशातील १० राज्यांमध्ये लागू झाला, म्हणून २४ डिसेंबरला पेसा दिवस साजरा होतो.
मुख्य अधिकार: ग्रामसभेला नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण, गाव विकासाचे नियोजन आणि अंमलबजावणी तसेच पारंपरिक पद्धतींनी वाद सोडवण्याचा अधिकार देतो.
महत्व: हा कायदा आदिवासी समुदायांना त्यांचे हक्क आणि परंपरा जपत स्थानिक स्वशासनाची शक्ती देतो.
पेसा दिवस साजरा करण्याचे स्वरूप:
या दिवशी पेसा कायद्याची माहिती देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम, लोकसंस्कृतीचे उत्सव आयोजित केले जातात.
ग्रामसभा सदस्य, पंचायत सदस्य आणि अधिकारी यात सहभागी होतात, ज्यामुळे आदिवासी लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होते.
थोडक्यात, पेसा दिवस हा आदिवासींच्या हक्क आणि स्वशासनाचा उत्सव आहे, जो प्रत्येक वर्षी २४ डिसेंबर रोजी साजरा होतो.
नवीन कार्यक्रम/योजना
बिरसा मुंडा
15 Nov 2025बोरदैवत
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी बोरदैवत येथील हनुमान मंदिरात बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली .
भगवान बिरसा मुंडा यांची यंदा 150 वी जयंती आहे. भगवान बिरसा मुंडा हे समस्त जनजाती समाज तसेच संपूर्ण देशवासीयांचे श्रद्धास्थान आहेत. इंग्रजांविरुद्ध आजीवन लढा देणारे ते महान क्रांतिकारक. सत्तेविरूद्ध संघर्ष करीत असतानाच त्यांनी धर्मांतर तसेच जनजाती समाजातील कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला, भारतीय संस्कृतीच्या रक्षण व संवर्धनाकरिता त्यांनी आजन्म प्रयत्न केले. केंद्र शासनाने भगवान बिरसा मुंडा यांचा 15 नोव्हेंबर हा जन्मदिवस ‘जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. यानिमित्त जनजाती क्रांती योद्ध्यांचे योगदान समाजापर्यंत पोहचेल.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जनजाती योद्ध्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. परंतु, हा इतिहास आजही दुर्लक्षित वंचित व अभ्यासापासून दूर आहे. इंग्रजांनी मांडणी केलेल्या इतिहासात विघटनवाद, अलगाववाद, जातीयता, विभाजन, वर्गवारी, वर्णभेद करणारा असल्याने व त्याचा पगडा आणि प्रभाव समाजव्यवस्थेवर वर्षानुवर्षे पडल्यामुळे, जनजाती समाजाचा प्राचीन काळापासूनचा गौरवशाली इतिहास आजही प्रतीक्षा करतो आहे. केंद्र शासनाने भगवान बिरसा मुंडा यांचा 15 नोव्हेंबर हा जन्मदिवस ’जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे जनजाती क्रांती योद्ध्यांचे योगदान समाजापर्यंत जाण्यासाठी खूप मोठी उपयोगिता ठरली आहे. शासन यासाठी अभिनंदनास पात्र आहे.
भगवान बिरसा मुंडा समस्त जनजाती समाज तसेच संपूर्ण देशवासीयांचे श्रद्धास्थान आहे. ते इंग्रजांविरुद्ध आजीवन लढा दिलेले महान क्रांतिकारक होते. सत्तेविरूद्ध संघर्ष करीत असतानाच त्यांनी धर्मांतर तसेच जनजाती समाजातील कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला, भारतीय संस्कृतीच्या रक्षण व संवर्धनाकरिता त्यांनी आजन्म प्रयत्न केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात दि. 15 ते 22 नोव्हेंबर हा आठवडा जनजातीय स्वातंत्र्यवीरांच्या व जननायकांच्या स्मरणाचा ’प्रेरक आठवडा’ (आयकॉनीक वीक) साजरा केला ही जनजाती समाजासाठी गौरवाची गोष्ट आहे. देशातील तरुण पिढीला स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या, तसेच हौतात्म्य पत्करलेल्या जनजाती क्रांतिकारकांची ओळख होईल. त्यांचे कार्य व बलिदान समाजाला प्रेरणादायी ठरेल. जनजाती समाजाने देशाला अनेक नरवीर दिले आहेत. मणिपूरचे जादोनांग, नागाराणी राणी गाईदिन्ल्यू, राजस्थानचे पुंजाभिल्ल, आंध्रप्रदेशचे अल्लूरी सीताराम राजू, केरळचे पळसी राजा तलक्कल चंदू, झारखंडचे तिलका मांझी, बुधू भगत, गोंड राजे शंकर शहा, रघुनाथ शहा, महाराष्ट्रातील राघोजी भांगरे, भागोजी नाईक, नाग्या कातकरी, बाबुराव शेडमाके या आणि अशा अनेक अनाम वीरांची माहिती जनजाती गौरव दिनाच्या निमित्ताने समाजासमोर येईल. म्हणून भारत सरकार विशेषतः पंतप्रधान व मंत्रिमंडळाचे हार्दिक अभिनंदन. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण आश्रम 15 नोव्हेंबर हा ’जनजाती गौरव दिन’ अधिक उत्साहात साजरा करतो आहे. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती भारताचे अगणित देशभक्त विशेषतः जनजाती बंधूंच्या माध्यमातून गौरवाने साजरी करून त्यांचे विशेष महत्त्वपूर्ण जीवन जनजाती समाजावर दूरगामी परिणाम करण्यास साहाय्यक ठरेल. भगवान बिरसा मुंडा यांनी सर्वसाधारण आणि सत्यनिष्ठ जनजाती बंधूंमध्ये देशप्रेमाचे भावजागरण केले. त्यांनी केलेल्या ’उलगुलान’ म्हणजे क्रांतीत हजारो सामान्य माणसे आपले जीवन भारतमातेच्या चरण कमलावर समर्पित करते झाले. ही ’उलगुलान’ हाक देऊन जनजाती समाज संघटित होण्यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण असाच आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी साध्या, सोप्या शब्दांत आपल्या लोकांना सांगितले की, ’साहेब साहेब एक टोपी’, म्हणजेच इंग्रजी राज्यकर्ते यांची टोपी आणि धर्मांतरण करणारे मिशनरी यांची टोपी एकच आहे. अर्थात, त्यांचे उद्दिष्ट एकच आहे. आज इंग्रजी राजवट संपुष्टात आली असली, तरी इंग्रजी विचारांच्या विषवल्लींचे पतन करण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे मिशनरींच्या अराष्ट्रीय कारवायांसाठी हा दिवस अनेक दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी सांगितलेल्या तीन शत्रूंत, विदेशी शासन, विदेशी पाद्री, आमचे शोषण करणारे आमचे लोक, यातले आमचे लोक कोण याचा नीरक्षीरविवेक समाजात येण्यासाठी या दिवसाचे महत्त्व नाकारता येणार नाही. यानिमित्ताने डोमबारीचा नरसंहार समाजाच्या समोर येईल. चार हजार मुंडा एकत्र आले होते. त्यांच्याकडे एकही बंदुक नव्हती. या चार हजार लोकांवर तीन तास झालेला गोळीबार, ज्या गोळीबारात सगळा डोंगर रक्ताने न्हाऊन निघाला होता. प्रचंड नरसंहार, जालियनवाला बागेपेक्षा कितीतरी भयावह होता. इंग्रजांनी हा डोमबारीचा डोंगर काबीज करूनही जननायक बिरसा त्यांच्या हाती लागले नाही. परंतु, इतिहासात याची फार नोंद घेतली गेली नाही. या निमित्ताने इतिहास लेखनाला नवी पाने मिळतील. 25 वर्षांची छोटी जीवनी सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीची ज्योत भारतीय जनजाती समाज जीवनात रचनात्मक कार्य करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विकसनशील प्रक्रियेत जनजाती जीवनाच्या विभिन्न पैलूंचा विचार करता भगवान बिरसा मुंडा यांच्या ’बिरसायत’ची सूत्रे आपण कायम स्मरणात ठेवली पाहिजेत. समाजबांधणीसाठीही ती उपयुक्त आहेत. त्यांनी ’व्यसन करू नका’ असे सांगितले. देव, देश आणि धर्मासाठी समर्पित आपले शरीर आणि मन शुद्ध ठेवण्याची आवश्यकता आहे. आपले घर नेहमी स्वच्छ ठेवा व आपल्या अंगणात तुळशीचे रोप लावा. गोमातेची सेवा करा व सर्व प्राणिमात्रांप्रति दयाभाव ठेवा. आपली संस्कृती, आपला धर्म आणि आपल्या पूर्वजांच्या प्रति श्रद्धा ठेवा. धर्म, संस्कृती व परंपरा यांना विसरू नका. कारण, तीच आपल्या समाजाची खरी ओळख आहे. हे परिवर्तन समाजमनात रुजवायचे असेल तर संघटित राहा, आपापसात लढू नका. ही ’बिरसायत’ची सूत्रे आपल्या जीवनाची जीवनसूत्रे होण्यासाठी या राष्ट्रीय जनजाती गौरव दिनाचे महत्त्व आहे. संपूर्ण समाजाला नवी दिशा देणार्या या नायकाचे नाव रांचीच्या विमानतळाला दिल्याने किंवा त्यांच्या जन्मदिनी झारखंड या नव्या राज्याची निर्मिती म्हणजे समाजासाठी गौरवान्वित गोष्ट आहे. म्हणून आपण संपूर्ण देशभर त्यांची जयंती ’राष्ट्रीय जनजाती गौरव दिन’ म्हणून साजरी केली पाहिजे. ज्या सर्व महापुरुषांनी पूर्ण समाजाला जोडण्याचे काम केले आहे. त्या सर्व वीरांची आज आठवण करून हे पवित्र कार्य पुढे वाढविण्याचा संकल्प करूया.
धरती आबा बिरसा मुंडा की जय। भारत माता की जय।
डोंगऱ्या देव उत्सव
बोरदैवत
डोंगऱ्या देव उत्सव
कथा डोंगऱ्यादेवाची निसर्गपुजक आदिवासी संस्कृतीची...
---------------------------------------------
भारतीय लोकजीवनात कामना सिद्धीचे व्रते भरपूर आहेत परंतु भारतीय लोक जिवनाचे एक अंग असलेल्या आदिवासी जमातीमधे अशी काही व्रते आहेत की, ती आचरण करण्यास अतिशय अवघड आहेत.मात्र तरीसुध्दा पुर्वजांची परंपरा ,सतत पुढे चालत रहावी,आदिवासी संस्कृतीचे सवंर्धन व्हावे
म्हणून आजचा सुशिक्षित आदिवासी सूध्दा ही व्रते अगदी काटेकोरपणे तितक्याच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहे आदिवासींच्या काही व्रतांपैकी 'डोंगऱ्यादेव ' या व्रताचे महत्व विशेध करणारा हा लेख..
--------------------------------------------
उत्तर महाराष्ट्रातील सातपूडा व सह्याद्रीच्या पर्वत रांगेत, अतिदुर्गम भागात ,डोंगराच्या कुशित राहणाऱ्या आदिवासींचे जिवन म्हणजे एक प्रकारची खडतर तपश्चर्याच.जिवन संघर्षाच्या वाटचालीत परंपरागत चालत असलेल्या सामुदायिक उत्सवांना , व्रतांना अंत:करणा पासून जपण्याचे काम आदिवासी समाज आजही मनोभावे करीत आहे.डोंगऱ्यादेव हे आदिवासींचे अतिशय खडतर व तितकेच महत्वाचे व्रत मानले जाते.हे व्रत आदिवासींच्या विविध जातीपैकी प्रामुख्याने कोकणा , महादेवकोळी भिल्ल , वारली , पावरा , मावची आदी जमातीचे लोक मोठया प्रमाणात साजरा करतात.
डोंगऱ्यादेव हे व्रत सामुदायिक रित्या पार पाडणारे नाशिक जिल्ह्यातील कळवण , पेठ , सुरगाणा , बागलान , दिंडोरी , ईगतपूरी , व त्रंबकेश्वर, धुळे जिल्ह्यातील साक्री तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व नवापूर या आदिवासी तालुक्यांमध्ये सालाबादा प्रमाणे साजरा केला जातो. प्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगऱ्यादेव हे व्रत तिन किंवा पाच वर्षांनी पाळतात.नियोजित वर्षाच्या मकशी म्हणजे मार्गशिर्ष महिण्याच्या अमावस्येला हे व्रत सुरु होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते.साधारणतः पंधरा दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी अलीकडे आठ दिवस पाळतात.ज्या गावात हे व्रत असते त्या गावातील आदिवासी या व्रताची महीणाभरा पासून तयारी करतात. सुरवातीला दवंडी देऊन गाव जमा करतात. प्रत्येक घरातून लोकवर्गणी निश्चित केली जाते आणि आपापल्या सगे सोयरे , नातेवाईकाना मुळ (आमंत्रण) धाडले जाते,लोकवर्गणी जमा झाल्यानंतर, व्रतासाठी आवश्यक असलेल्या लाल बोकड ,लाल कोंबडा ,लाल कोंबडी, काळी पाठ (बकरी) मेंढा,फिरंग्या कोंबडा ,धवळा कोंबडा आदी वस्तुंची जमवा जमव करतात.
व्रताच्या पहिल्या दिवशी व्रत घेणारे सर्व लोक आणि पाच माऊल्या कन्सरा, वाघंब्रा, झेलाशेवर,फुलाशेवर,ताराशेवर यांना उपवासी ठेवले जाते. सायंकाळी सर्व स्नान करून आपल्या गावाच्या रितीरीवाजा प्रमाणे गावातील पाटलाच्या घरी अथवा मंदिरा समोर जमा होतात.येथे गावचा पाटील , भगत , मुधानी (मुख्य माऊली) खुट्या (डोंगऱ्यादेवाचा प्रमुख) पावरकर , कथकरी यांच्या हस्ते थोंब ठोकले जाते.वेळूच्या काठी भोवती, मुळासकट उपटलेली झेंडूची झाडे,देवअंबाडी , ऊस , देवकरडू ,ही झाडे अर्धीवर राहतील अशा तऱ्हेने रोवतात त्याच्याभोवती खुळखुळ्याची काठी मोरपिसांचा कुच्चा ,पावरी (वाळलेल्या भोपळ्या पासून बनविलेले एक वादय)ठेवतात. या व्रताची परिपूर्ण माहीती असलेला भगत येथे सव्वाशे पुंजा टाकून थोंबाची पूजा करतो.पुजा अर्चा आटोपल्यावर भगत डोंगऱ्यादेवाच्या कथेस प्रारंभ करतो.ही कथा (कासाचे ताटात कोताई मेन लाउन त्यावर भानसऱ्या सर (जंगलातील एका झाडाची काडी )उभा करतात.तो सर दोन्ही हाताच्या बोटाने हळूवार ओढल्यास त्याचे कंपन होउन , तिचा अतिशय मधूर असा सुर निघतो ,त्याच्या सुरात सुर मिसळून गायीली जाते.भगत सुरवातीला पाच नमन म्हणून कथेस प्रारंभ करतो, झिलक्या त्याला साथ देतो.या कथेतून डोंगऱ्यादेवांच्या सर्व माऊल्या , भूतांची नावे घेताच व्रत घेतलेल्या लोकांच्या अंगात हवा येते , वारे संचारते आणि सुड उठून सर्व माऊल्या, भूत घुमू लागतात. व्रत घेतलेल्या लोकांच्या समूहाला ' माऊल्या किंवा भाया ' अशी संज्ञा आहे.या कालावधीत व्रतस्तांना नावाने हाक मारत नाहीत.फक्त ' माऊली 'म्हणून हाक मारतात.
पहिल्या दिवशी मंदिरासमोर किंवा पाटलाच्या घरासमोर देव खेळविल्यानंतर त्याच रात्री मुधानी माऊली तेथून थोंब हालविते.आणि सर्वांना घेऊन गावातील 'चोखीखळीवर येते. मुधानीने दर्शविलेल्या ठिकाणी थोंब ठेवला जातो.या जागेस मठ किवा मकान असे म्हणतात. दरम्यान उपाशी असलेल्या माऊल्या उपवास सोडतात.रात्री पुन्हा व्रत घेतलेल्या माऊल्या गोल रिंगन करून थोंबा भोवती बसतात.भगत कथकरी पुन्हा कथेस प्रारंभ करतो.पाच नमन म्हणून समुद्र किनाऱ्यापासुन -केमच्या डोंगरापर्यंत सर्व डोंगऱ्यादेवांच्या गडांचा उल्लेख करतो.गावाच्या शिवारातल्या म्हसोबा ,भौऱ्याभूत,नागदेव , वाघदेव, आग्यादेव , गाऱ्यादेव , हिरवा देव , रानदेव, पायऱ्याची कन्सरा, धानीच्या सर्व माऊंल्या , च्या नावाने आरोळी ठोकताच सुड उठतो. थोंबाभोवती बसलेल्या सर्व माऊल्या घूमू लागतात.प्रत्येक माउली आपल्या डोंगऱ्यादेवांच्या गडाच्या तथा गौळाच्या दिशेने तोंड करून शेला धरतात (हात जोडतात)
खुट्या हातात खुळखुळ्याची काठी घेऊन , कमरेला असलेला गौरीसाठ (अंबाडीच्या तागा पासुन विनलेला खाकडा) जोरात फटकावतो, आणि " तो पायऱ्यांना.... भुत रे..असे म्हणताच सर्व माऊल्या , भुत एकच टाहो फोडतात व घूमायला लागतात,यानंतर सर्व माऊल्यांसह , ग्रामस्थ थोंबाभोवती गोल फिरत नाचु , गाऊ लागतात.
सावऱ्या माळीवर कोण
गायी चारे , चारे व
सावऱ्या माळीवर
उन्ह्या गायी चारे, चारे व
खडकाच्या टपावरी
कोण पावा वाजे,वाजे व
खडकाच्या टपावरी
उन्ह्या पावा वाजे वाजे व ..
दुधामे तळ्यावरी ..
कोण गायी पाजे, पाजे व.
दुधामे तळ्यावरी...
उन्ह्या गायी पाजे ,पाजे व..
अशी विविध गाणी गाऊन, नाचून, पहिल्या दिवशी मोठया उत्साहात जागरण केली जाते.
हे व्रत आदिवासींच्या दृष्टीने अतिशय खडतर व्रत असून, या व्रतात अनेक प्रकारची बंधने आहेत.भायांनी तथा माऊंल्यानी या सात दिवसाच्या कालावधीत मठातच मुक्काम करावयाचा असतो.स्वतःच्या घरी सुध्दा जायचे नाही.व्रत काळात दारू व मासांहार करायचे नसते.भात , गहूची चपाती ,गोडेतेल,हळद खायचे नाही.फक्त नागलीची भाकरी , भगर , दाळ खायची असते. माऊंल्यानी मठातच भोजन करायचे, चप्पल चामड्याची वस्तू वापरायची नाही.स्रीसंगत पुर्णपणे वर्ज असते.
दुसऱ्या दिवसा पासून रोज माऊल्या शेज,कमारी मागण्या साठी बाहेरगावी, जवळपासच्या वस्ती पाडयावर जातात.यावेळी आदिवासी स्रिंया दिव्याचे ताट करून माऊंल्याना ओवाळतात आणि नागलीचे पिठ ,भात , बाजरी , लाल मिर्ची आदिच्या स्वरुपातील शेज,कमारी बरकत्या बोवाच्या झोळीत टाकतात . यावेळी बरकत्या बोवा , धन धान्यांची बरकता लाभु दे...गायी गुराना लक्ष्मीला सुख शांती लाभू दे...असे आशिर्वाद देतो. आदिवासी आदराने सर्व माऊल्यांना आपल्या घरात , गोठयात बोलावून मक्याच्या फुल्या , कोंडी, भाजलेल्या भुईमुंगाच्या शेंगा,डांगर फराळ म्हणून खाऊ घालतात.
सायंकाळी माऊल्या गाव मागून परत मठावर आल्यावर , कमारीच्या धान्यातून स्वंयपाक बनवितात आणि उपवास सोडतात, पुन्हा पहिल्या दिवसा प्रमाने व्रतास सुरवात होते. अशाप्रकारे सलग सात दिवस डोंगऱ्यादेवांची ही दिनचर्या अंखडीत सुरू राहते.
सातव्या दिवशी सायंकाळी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला गावातील चोखीखळी ढाळली जाते.भगत मठावरील थोंबाची विधीवत पूजा करून थोंब उपटतो.त्यांच्या सोबत व्रतात सामिल असलेल्या सर्व माऊल्या ,भाया , अबाल वृद्ध , ग्रामस्थ, डोंगऱ्यादेवाचे गाणे म्हणत , गड घेण्यासाठी गौळाच्या दिशेने रवाना होतात. रात्री गडाच्या (गौळाच्या) पायथ्याशी मुक्काम ठोकतात.या जागेला ' रानखळी ' असे म्हणतात.तेथे पुन्हा थोंब रोवला जातो.दरम्यान गावातील प्रमुख ग्रामस्थ, भगत , मुधानी गौळा जवळ जातात,तेथे स्वच्छता , सारवण करतात.पाच आरत्या , महादऱ्या (मोठा दगडी दिवा) अगरबत्ती लावतात.गौळाच्या गुहेसमोर कोरा शेला (उपरणे) धरतात.तेथे भगत कन्सरा (नागली) तांदूळाच्या सव्वाशे पूंजा टाकतो.संपुर्ण पुजा अर्चा झाल्यावर भगत मोठयाने पाच वेळा लक्ष्मीच्या नावाने 'लक्ष्मे, असा आवाज देताच ,खाली रानखळीवर थोंबाभोवती बसलेल्या माऊल्या ,भायांचा सुड उठतो (अंगात येते) आणि सर्व माऊल्या घुमू लागतात , गाणे म्हणून नाचू लागतात.
(या गाण्याची प्रत्येक ओळ दोन वेळा गातात)
शिटीना पावा वाजे रे ,महादेव रे
शेंदोडनी हवा भारी रे,महादेव रे
शिटीना पावा वाजे रे,महादेव रे
कन्साऱ्यानी हवाभारीरे महादेव रे
शिटीना पावा वाजे रे महादेव रे
भुयारनी हवा भारी रे ,महादेव रे
शिटीना पावा वाजे रे,महादेव रे
मांडव्यानी हवा भारी रे महादेव रे
शिटीना पावा वाजे रे,महादेव रे
पायऱ्यांनी हवा भारी रे ,महादेव रे
शिटीना पावा वाजे रे ,महादेव रे
या अशा अनेक प्रकरच्या डोंगऱ्यादेवांच्या नावांची गाणी गायीली जातात.
या दिवशी मात्र सर्व माऊल्या पहाटे पाच वाजताच नेहमी प्रमाने नदीवर जाऊन स्नान करतात. त्यानंतर प्रत्येक माऊलीच्या कमरेला कोरा शेल्याची (ऊपरण्याची ) ओटी बांधली जाते. ओटीत डाळी पोहे , नारळ बांधतात. सर्व माऊल्या झुंज्यामुंज्यालाच गडावर चढून गौळाजवळ जातात.तेथे गौळाजवळ एक कोरा शेला आडवा बांधलेला असतो,तो ओलांडून सर्व माऊल्या ओटीतील डाळी पोहे वाहतात दर्शन घेतात आणि " हे डोंगऱ्यादेवा, सालाबादा प्रमाणे आम्ही आज तुझ्या दर्शनाला आलो आहोत, तूझा खाना बोना तुला अर्पन करीत आहोत, तरी आमच्या लक्ष्मीला (गायी गुरे ढोरे ) आम्हाला ,आमच्या मुला बाळांणा आमच्या गावाला सुखी ठेव आमच्या शेती बाडीत धान्याला बरकत येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करतात.
भगत या जागी लाल कोंबडा जिवंत सोडतो तर लाल बोकडाला फक्त मानवतो येथे मात्र बोकड बळी दिला जात नाही.काही ठिकानचे डोंगऱ्यादेवाचे गौळ डोंगराच्या अत्यंत अवघड कपारीत,गुहेत आहेत.अशा गौळात घूसणे म्हणजे एक प्रकारे दिव्य परिक्षाच असते.परंतु या कालावधीत गौळात घूसने माऊल्यांना फारसे अवघड नसते.काही गौळांचे द्वार इतर दिवसांपेक्षा या दिवशी आकाराने मोठे होत असल्याचे सांगतात.ही सुध्दा एक प्रकारे डोंगऱ्यादेवांचीच कृपा आहे अशी आदिवासींची श्रद्धा आहे. माऊल्यांचे दर्शन झाल्यानंतर ओटीसोबत घेतलेला नारळ येथे गौळाला हळूच ठोकतात,फोडत नाही.
येथील पूजा आटोपल्यावर सर्व माऊल्या आपल्या गाव वस्ती जवळील धानीवर (स्थानी) येतात.भगत येथे स्वच्छता सारवण करुन धानीला शेंदूर लावतो.या जागेवर सुध्दा तांदूळ कन्सराच्या सव्वाशे पूंजा टाकल्या जातात.हा या व्रताचा समाप्तीचा दिवस असल्याने येथे आदिवासी महीला ,अबाल वृद्ध , पाहूणे रावळे , सगे सोयरे मोठया संख्येने उपस्थित राहतात. नेहमी प्रमाणे धानीवरही कथा लाऊन सुड उठविला जातो.थोडे नाचगाणे झाली की गावातील पाच पंच , भगत , मुधानी , खूटया शेज वाळतात, भगत झेंडूची पाच फुले हातात धरून माऊल्यांना (आपापला वारा) फुले जिंकायला लावतो.या नंतर माऊल्यांच्या अंगातील वारे मोडले जाते.धानीजवळ कोरा शेला अंथरुन सर्व माऊल्या प्रत्येकी एक ओंजळ या प्रमाणे कमारी(नागली) घालतात.त्या कमारीचे धानीवर जमलेल्या सर्व ग्रामस्थांना प्रसाद म्हणून वाटप करतात. या जागेवर आदिवासी लोक ,महीला विविध प्रकारचे नवस करतात , फेडतात. मुलबाळ संतती होत नसलेल्या महिलांना डोंगऱ्यादेवाला केलेल्या नवसातुन संतती झाल्याची आदिवासींची श्रद्धा आहे.
व्रत घेतलेल्यांचे अंगातील वारे नष्ट व्हावे म्हणून आपापल्या वाऱ्यानुसार बोकड , कोंबडयाचा बळी दिला जातो.गौळाला मान देऊन आनलेला लाल बोकड , कोंबडा धानीवर बळी देतात. शिवारातील रानवा देवाला धवळा कोंबडा जिवंत सोडतात. भौऱ्याभूत - खैरा कोंबडा,गाव माऊल्या - लाल कोंबडा , लाल कोंबडी , काळभूत- लाल कोंबडा, म्हसोबा फिरंग्या कोंबडा ,हिरवा देव - काळी पाठ(बकरी) आदी वस्तूंचा बळी देण्याचा कार्यक्रम होतो.लोकवर्गणीतून खरेदी केलेल्या सर्व बोकडांना बळी देऊन रात्री सर्व गावाला गाव जेवण दिले जाते .याला भंडारा असे म्हणतात.
दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरुन मागितलेल्या कमारीचे ,नारळ प्रसादाचे सर्वाना वाटप करून टोप्या घालण्याचा कार्यक्रम होतो.अशाप्रकारे आदिवासींच्या डोंगऱ्यादेवाच्या व्रताची सांगता होते.
----------------------------------------------
" आमच्या आदिवासी लोकांची वस्ती प्रामुख्याने अती दुर्गम भागात ,जंगलात ,डोंगर दऱ्यात आढळते.आम्ही शेती व मजूरी करतो.आमचा जोडधंदा गायी, गुरेढोरे , बकऱ्या ,कोंबडया पाळून उदारनिर्वाह करणे हा होय.आणि हीच खरी आमची संपत्ती आहे. ही जनावरे म्हणजे आमची लक्ष्मी आहे.चारा पाण्यासाठी ती सतत डोंगर दऱ्यात भटकत असतात. त्यांचे जंगलातील हिंस्रपशु पासून, डोंगरात वास्तव्य असलेल्या आमच्या देव देवतांपासून संरक्षण व्हावे या मुख्य उद्देशाने आदिवासी डोंगऱ्यादेवाची आराधना,व्रत करतात.त्या वंशपरंपरे नुसार आम्ही सुशिक्षित आदिवासी देखील हे व्रत अत्यंत निष्ठेने व मनोभावे करीत आहोत
प्रशासकीय रचना
मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक